शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाकडून बी.ए. भाग ३ ची १६ पुस्तके प्रकाशित
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाने बी.ए. भाग ३ च्या अभ्यासक्रमासाठी तयार केलेली पाच दूरस्थ अभ्यासक्रमाची आणि अकरा क्रमिक अभ्यासक्रमाची अशी एकूण १६ पुस्तके प्रकाशित करण्यात आली. या पुस्तकांचे प्रकाशन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. रजनीश कामत यांच्या हस्ते करण्यात आले.
कुलगुरू डॉ. कामत म्हणाले की, प्रवेश प्रक्रिया सुरू असतानाच विद्यार्थ्यांना दूरस्थ व क्रमिक अभ्यासक्रमांची पुस्तके उपलब्ध करून देणे ही महत्त्वाची बाब आहे. नियमित तसेच दूरशिक्षणाच्या विद्यार्थ्यांना वेळेत अभ्याससाहित्य उपलब्ध होणे आवश्यक आहे. शिक्षक प्रज्ञावंत आणि बहुआयामी असतात. इतिहास हा केवळ भूतकाळाचा अभ्यास नसून वर्तमान समजून घेण्यासाठी आणि भविष्याची दिशा निश्चित करण्यासाठी महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे इतिहासाच्या अभ्याससाहित्यात संदर्भग्रंथ, क्यूआर कोड, संबंधित संकेतस्थळे आणि इतर डिजिटल साधनांचा समावेश करून विद्यार्थ्यांना मूळ माहितीपर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध करून द्यावी.
यावेळी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. चंद्रवर्धन नाईक, इतिहास अधिविभाग प्रमुख प्रा. डॉ. अवनीश पाटील, दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. कृष्णा पाटील, अभ्यास मंडळ विभागाच्या श्रीमती संध्या अडसुळे, दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे उपकुलसचिव श्री. विनय शिंदे, श्री. दिलीप मोहाडीकर, श्री. दीपक काशिद तसेच विविध पुस्तकांचे संपादक व लेखक उपस्थित होते.
प्रकाशित साहित्य
बी.ए. भाग ३, सत्र ५ व ६ : इतिहास क्रमिक पुस्तके
स्थानिक इतिहास : संकल्पना आणि पद्धती, कोल्हापूरचा वारसा, आधुनिक जगाचा इतिहास, स्थानिक इतिहासाचे उपयोजन, मध्ययुगीन भारताचा इतिहास, प्राचीन भारताचा इतिहास, इतिहास : सिद्धांत आणि नवे प्रवाह, इतिहासलेखनाची तंत्रे यांसह एकूण ११ पुस्तके प्रकाशित करण्यात आली.
इतिहास दूरस्थ अभ्यासक्रमाचे स्वयंअध्ययन साहित्य
इतिहास : सिद्धांत आणि नवे प्रवाह, इतिहासलेखनाची तंत्रे, प्राचीन भारताचा इतिहास, आधुनिक जगाचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि मराठा साम्राज्याचा उदय व दृढीकरण या विषयांची एकूण ५ पुस्तके प्रकाशित करण्यात आली.
विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या टप्प्यावरच अभ्याससाहित्य उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमामुळे विद्यापीठाच्या नियमित तसेच दूरशिक्षणातील विद्यार्थ्यांना वेळेत आणि गुणवत्तापूर्ण अभ्याससाहित्य उपलब्ध होणार आहे. इतिहास विषयाच्या अभ्याससाहित्यात झालेली ही निर्मिती विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाच्या तसेच लेखक, संपादक आणि संबंधित विभागांच्या समन्वित कार्याची उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे.


Leave a Reply