भारताची घोडदौड थांबवणे आता अशक्य : देवेंद्र फडणवीस

भारताची घोडदौड थांबवणे आता अशक्य : देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे ‘हर घर तिरंगा अभियान’ अंतर्गत तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात पार पडली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, तिरंगा रॅलीच्या निमित्ताने आज या ठिकाणी महासागर पाहायला मिळत आहे. या तिरंग्याकरिता क्रांतिकारकांनी बलिदान दिले, सैनिकांनी सीमेवर मरण पत्करले, तमाम भारतवासियांनी संघर्ष केला, तो तिरंगा 15 ऑगस्ट 1947 ला मध्यरात्री फडकला आणि तो चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत डौलाने फडकत राहील.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भारत जगातली चौथी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनलेला आहे. भारत सर्वच क्षेत्रात प्रगती करत आहे. जगातला कुठलाच देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपलं अंतरिक्ष यान उतरवू शकला नाही. पण हे कठीण कार्य भारताच्या वैज्ञानिकांनी साध्य करून दाखवले. तसेच अमेरिकेनंतर अंतराळामध्ये पहिल्यांदा खासगी कंपनीच्या माध्यमातून अंतराळ यान सोडणारा आपला देश आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी स्टार्टअप इकोसिस्टीम म्हणून भारत जगासमोर उभा राहिला असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

जगामध्ये सर्वाधिक युवा असलेल्या आपल्या भारताच्या प्रगतीला कोणी थांबवू शकत नाही, काही परकीय शक्ती भारताची घोडदौड थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, परंतु भारताला महासत्ता होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. 2047 मध्ये भारत हा जगातला विकसित देश म्हणून या जगाच्या नकाशावर पाहायला मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, तिरंग्याचा सन्मान आमच्या मनामध्ये आहे, आपले संविधान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचा स्वाभिमान असलेला तिरंग्याच्या सन्मानासाठी 9 ऑगस्ट या क्रांती दिनापासून तिरंगा यात्रेला सुरुवात केली आहे. 1942 ची क्रांती ही ‘भारत छोडो’ची होती. आताची क्रांती ही विकसित भारत तयार करण्याकरता करो या मरोची आहे. ही क्रांती भारतविरोधी शक्तींना भारत छोडो म्हणण्याची क्रांती आहे. या क्रांतीच्या माध्यमातून आपल्याला उद्याचा एक स्वाभिमानी भारत घडवायचा आहे आणि या स्वाभिमानी भारतामध्ये जसा तिरंगा सगळ्यात वर राहील, तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्रदेखील आघाडीवर आपल्याला दिसेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रसंगी अधोरेखित केले.

यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार रविंद्र चव्हाण, आमदार अमीत साटम, पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांच्यासह इतर आमदार व महापौर उपस्थित होत्या.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*