उदयनराजे भोसले यांनी घेतली रक्षा खडसे यांची सदिच्छा भेट,सातारा जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासंदर्भात सविस्तर चर्चा

सातारा: साताऱ्याचे  लोकसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री  रक्षा खडसे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान सातारा जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

उदयनराजे भोसले म्हणाले की, सातारा जिल्ह्याने बास्केटबॉल खेळात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू देशाला दिले आहेत. सध्या सातारा येथील छत्रपती शाहू स्टेडियम येथील बास्केटबॉल मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा आयोजित करण्यास काही मर्यादा येत आहेत. त्यामुळे याच ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे इनडोअर बास्केटबॉल कोर्ट उभारण्यात यावे, जेणेकरून आपल्या खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी दर्जेदार सराव करता येईल, अशी मागणी केल्याचे उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

धनुर्विद्या (आर्चरी) या खेळात सातारा जिल्ह्याने देशाला अदिती स्वामी आणि ओजस देवतळे यांसारखे अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू दिले आहेत. याशिवाय प्रवीण जाधव आणि पार्थ साळुंखे यांनी ऑलिम्पिक तसेच विश्वचषक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे. या खेळासह इतर क्रीडा प्रकारांतील खेळाडूंनाही सर्व सुविधांनी सुसज्ज सराव केंद्र व मैदान उपलब्ध करून देण्याची विनंती यावेळी करण्यात आली.

यावेळी सातारा जिल्ह्यातील इतर क्रीडा प्रकारांच्या विकासाबाबतही सकारात्मक चर्चा झाली. या सर्व मागण्यांचा राज्य शासनाशी समन्वय साधून पाठपुरावा केला जाईल आणि आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा सकारात्मक विश्वास राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी व्यक्त केला.

सातारा जिल्ह्याच्या खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि त्यांच्या गुणवत्तेला योग्य व्यासपीठ मिळावे, यासाठी आमचा सातत्याने पाठपुरावा सुरू राहील, असं खासदार उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केलं.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*