सातारा जिल्ह्यात नवीन आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याची संधी; ५ ते १८ ऑगस्टदरम्यान अर्ज स्वीकारणार
सातारा : सातारा जिल्ह्यात नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू करण्यासाठी इच्छुक व्यक्ती आणि महाविद्यालयांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया ५ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सुरू राहणार असून, जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायत, नगरपंचायत आणि नगरपरिषदनिहाय रिक्त जागांची यादी, अर्जाचा नमुना तसेच अटी व शर्ती आणि आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्जाचा नमुना सातारा जिल्ह्याचे https:/www.satara.gov in या संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय यांच्या नोटीस बोर्डवर उपलब्ध करून दिल्या आहेत.
राज्य शासनाच्या विविध शासन निर्णयांनुसार आपले सरकार सेवा केंद्रांचे वितरण अधिक पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी सुधारित निवड प्रक्रिया लागू करण्यात आली आहे. त्यानुसार आता गुणांकन पद्धती, किमान पात्रता, आवश्यक पायाभूत सुविधा, मुलाखत, कार्यप्रदर्शनावर आधारित कराराचे नूतनीकरण तसेच अपात्रतेचे निकष यांचा विचार करून सेवा केंद्रांचे वाटप करण्यात येणार आहे.
राज्यातील ज्या महाविद्यालयांकडून आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याची मागणी केली जाईल, त्या महाविद्यालयांनाही शासनाच्या तरतुदीनुसार केंद्र मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज पूर्णपणे भरून, आवश्यक कागदपत्रांसह आपल्या गावाचा समावेश ज्या महसुली उपविभागात होतो त्या उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयात जमा करावा.
सातारा व जावली तालुका – उपविभागीय अधिकारी, सातारा , कोरेगाव तालुका – उपविभागीय अधिकारी, कोरेगाव , कराड तालुका – उपविभागीय अधिकारी, कराड, पाटण तालुका – उपविभागीय अधिकारी, पाटण, फलटण तालुका – उपविभागीय अधिकारी, फलटण, माण व खटाव तालुके – उपविभागीय अधिकारी, माण-खटाव व वाई, महाबळेश्वर व खंडाळा तालुके – उपविभागीय अधिकारी, वाई या ठिकाणी अर्ज जमा करावे. जिल्हा प्रशासनाने पात्रता पूर्ण करणाऱ्या इच्छुक व्यक्ती आणि महाविद्यालयांनी अर्ज सादर करण्यापूर्वी अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले आहे.


Leave a Reply