भारताचे संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा आणि लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. संविधानाने भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक बनवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते.
संविधान सभेने संविधानाची निर्मिती केली, ज्याचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद होते आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. संविधान तयार करण्यासाठी २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवस लागले.
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने ते स्वीकारले, म्हणूनच हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. आणि २६ जानेवारी १९५० पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली, जो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त, भारत सरकारने नागरिकांमध्ये संविधानाच्या मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि डॉ. आंबेडकरांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी २०१५ पासून २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.
संविधानाच्या प्रस्तावनेत (उद्देशिका) संविधानाची मूळ तत्त्वे आणि उद्दिष्ट्ये स्पष्ट केली आहेत. यानुसार, सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये सुनिश्चित केली आहेत. नागरिकांचे मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्ये यात नमूद केलेली आहेत.
सुरुवातीला संविधानात २२ भाग, ८ अनुसूची आणि ३९५ कलमे होती. सध्या (जानेवारी २०२० नुसार) यात ४४८ हून अधिक कलमे आणि १२ अनुसूची आहेत. भारतीय संविधान लवचिक आणि ताठरतेचा समन्वय साधते, ज्यामुळे गरजेनुसार त्यात दुरुस्त्या करण्याची सोय आहे.
हे संविधान केवळ कायद्याचा दस्तऐवज नसून ते भारतीय नागरिकांसाठी समान संधी, न्याय आणि सन्मानाचे जीवन जगण्याचा मार्गदर्शक ग्रंथ आहे.
Preamble to Constitution : राज्यघटनेचा सरनामा
”आम्ही, भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी , धर्मनिरपेक्ष, लोकशाही , गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि
त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता सुनिश्चित करणारे बंधुत्व वाढीस लावण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून,
आमच्या संविधान सभेत आज, २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी, याद्वारे हे संविधान अंगीकृत, अधिनियमित आणि स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.”



Leave a Reply