क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारखे चारित्र्यसंपन्न राजकारणी निर्माण करण्याचा ध्यास घ्या : संपतराव मोरे

सातारा – क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलेले सातारचे प्रतिसरकार हे सर्वसामान्यांच्या हिताचे असे होते व इंग्रजधार्जिण्या शोषकांच्या विरोधात ते कार्यरत होते. म्हणूनच ते आमचा अभिमान आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारखे चारित्र्यसंपन्न असे राजकारणी व समाजकारणी निर्माण करण्याचा ध्यास घेतला पाहिजे हेच खरे त्यांना अभिवादन ठरेल असे प्रतिपादन जेष्ठ स्तंभलेखक व पत्रकार साहित्यिक संपत मोरे यांनी सातारा येथे बोलताना केले.

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या 125 व्या जयंती वर्ष व सातारा येथे होणारे पंधरावे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन यांचे औचित्य साधून विद्रोही सांस्कृतिक चळवळ सातारच्या वतीने सातारा येथे संपतराव मोरे यांचे *आमचा स्वाभिमान – सातारचे प्रतिसरकार* या विषयावर व्याख्यान तसेच क्रांतिसिंह नाना पाटील यांचे सहकारी असलेले ह भ प जिजाबा मोहिते महाराज यांच्या कन्या व क्रांतिसिंह नाना पाटील यांचा सहवास लाभलेल्या श्रीमती विजयाताई जाधव यांचा सत्कार असा दुहेरी कार्यक्रम सातारच्या दैवज्ञ मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.
प्रमुख पाहुणे म्हणून गाडगे महाराज मिशनचे चेअरमन मधुसूदन मोहिते उपस्थित होते. अध्यक्षस्थानी ह.भ.प. डॉ. सुहास फडतरे महाराज होते. विचार मंचावर विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राचे प्रवक्ते विजय मांडके होते.

सध्याचे राजकीय नेत्यांची वक्तव्ये पाहता व राजकीय धुळवड पाहता क्रांतिसिंह नाना पाटील हे स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात ज्या साधनसूचीतेने वागले ती आज काल राजकारण्यांच्या कडून बाजूला फेकली गेलेली आहे असे दिसते असे सांगून संपत मोरे म्हणाले की क्रांतिसिंहांचा वारसा आपण जपताय हे फार महत्त्वाचे आहे आणि ह भ प जिजाबा मोहिते महाराज यांच्या कन्या श्रीमती विजयाताई जाधव यांचा उचित असा सन्मान आपण केला हे योग्यच आहे.यावेळी उपस्थित त्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाही संपतराव मोरे यांनी समर्पक माहिती देऊन उत्तरे दिली.

ह.भ.प. डॉ सुहास महाराज यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांनी वारकरी संत व सत्यशोधकी चळवळीचा विचार घेऊन समतेचे विचार समाजामध्ये प्रस्थापित करण्याचे काम केले आणि हे काम करताना त्यांनी शोषकांना धडा शिकवण्यासाठी प्रति सरकार स्थापन केले आणि या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केले. त्याचबरोबर कर्मवीरांना आणि गाडगे महाराजांना आदर्श मानून समाजात शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले हे महत्त्वाचे आहे.
आजच्या राजकारण्यांना सातारचे प्रतिसरकार काय चीज होती याचा हिसका तरुणांनी दाखवून दिला पाहिजे असे आवाहनही डॉ. फडतरे महाराज यांनी केले.

यावेळी श्रीमती विजयाताई जाधव यांचा शाल , पुस्तक व क्रांतिसिंह नाना पाटील यांचे छायाचित्र देऊन ह भ प डॉ सुहास फडतरे महाराज यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविकामध्ये विजय मांडके यांनी विद्रोही सांस्कृतिक चळवळ स्थापन करण्याबाबतचे व विद्रोही साहित्य संस्कृती संमेलने घेण्यामागची भूमिका विशद करताना क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त यांना सातारला होणारे पंधरावे विद्रोही साहित्य संमेलन हे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्यास आम्ही समर्पित करत आहोत असे सांगितले.
सूत्रसंचालन प्रा गौतम काटकर यांनी केले तर आभार शिवराम ठवरे यांनी मानले.

या कार्यक्रमास ह भ प जिजाबा मोहिते महाराज यांचे कुटुंबीय तसेच सातारा शहरातील व जिल्ह्यातील समविचारी संघटनांचे कार्यकर्ते नेते तसेच विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी आणि करण्यासाठी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*