MPSC नवी मुंबई :महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 ची प्रवेश प्रमाणपत्र उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. ही परीक्षा रविवार, दिनांक २९ जून, २०२५ रोजी होणार आहे. नियोजित महाराष्ट्र अराजपत्रित, गट-ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ करीता प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील प्रवेशपात्र उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली आहे.
विद्यार्थ्यानी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात :
परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच, प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतः च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.
आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना तसेच आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘Guidelines for Examination’ या सदराखाली उपलब्ध असलेल्या ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्या वेळी उमेदवारांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना’ यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. आयोगाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार ठराविक कालावधीसाठी अथवा कायमस्वरुपी प्रतिरोधनाची (Debar) तसेच, प्रचलित नियम /कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल.
प्रवेशप्रमाणपत्र मिळविण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास आयोगाच्या contact-secretary@mpsc.gov.in व support-online@mpsc.gov.in या ईमेल व/अथवा ०२२६९१२३९१४ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरुन विहित वेळेत संपर्क साधण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.



Leave a Reply