Raigad: रायगडावरील संत -स्वराज्य-संविधान मोहिमेला महाराष्ट्रभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

रायगडावरील संत -स्वराज्य-संविधान मोहिमेला महाराष्ट्रभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवशंभु प्रतिष्ठान आयोजित संत- स्वराज्य-संविधान या मोहिमेत स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड याठिकाणी महाराष्ट्रातील हजारो तरुण, अबाल-वृद्ध, महिला व वारकरी मोठया संख्येने सहभागी झाले होते. मंगळवार दिनांक 25 रोजी दुपारी महाड येथील चवदार तळ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.तेथील क्रांतीस्तंभ जेथे मनुस्मृतीचे दहन डॉ. बाबासाहेबांनी केले आणि आपल्यासारख्या बहुजनांना नवीन जगाची कवाडे खुली करण्यात आली,त्याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली.

ह.भ.प.डॉ. सुहास महाराज फडतरे यांचे कीर्तन

सायंकाळी माँसाहेब जिजाऊ समाधी पाचाड येथे ह.भ.प.डॉ. सुहास महाराज फडतरे, कोरेगावकर यांनी कीर्तनाच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांना वैचारिक मेजवानी दिली.आजही आपण वैचारिक गुलामगिरीत आहोत. चुकीच्या कालबाह्य रूढी,परंपरा,अंधश्रद्धा, समाजा-समाजात धार्मिक,जातीय तेढ निर्माण करणाऱ्या विषारी विचार पसरविणाऱ्या लोकांच्या आहारी जाऊन त्यांच्या विचाराने वागत आहोत.आपल्या धडावर आपले डोके असावे अर्थात आपण विचार करून वागावे असे फडतरे महाराज यांनी सांगितले. संतांचे विचार आणि त्यांनी समाजासाठी दिलेले योगदान,छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदार व अठरा पगड जातींना सोबत घेऊन उभे केलेले स्वराज्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकसंघ भारत उभा राहण्यासाठी तयार केलेली राज्यघटना यांचा वारकरी संप्रदायतील संतांशी असलेला धागा विविध संतांच्या अभंगातून समाजाला उलगडून सांगितल्याने हाच संतविचार परिवर्तनाची नांदी ठरू शकेल असे विचारांनी प्रेरित झालेल्या अनेक तरुणांनी सांगितले.

“संत-स्वराज्य- संविधान” ही त्रिसूत्री विचारधारा समाज मनामध्ये नेटाने रुजवायची आहे. पुढील वर्षीच्या 26 नोव्हेंबरच्या रायगड मोहिमेची तयारी आजपासुन सुरु करायची आहे. ही आपणा सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. एकमेकांना बळ देऊन,संघटित राहून,पेटवलेला हा विचारांचा दीप प्रज्वलीत केला आहे.त्याला आपल्या हृदयात सतत तेवत ठेवून संतविचार समाज जागृतीसाठी कशा रीतीने उपयोगी ठरणार आहे याचे आत्मभान कैकाडी महाराज मठाचे मठाधीपती ह.भ.प.भारत महाराज जाधव यांनी करून दिले.

 

यावेळी सर्व जातीधर्मीयांनी प्रार्थना करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना अर्पण केली. त्यामध्ये हिंदू,मुस्लिम, ख्रिश्चन, जैन,बौद्ध लिंगायत असे सर्व धर्माचे लोक सहभागी झाले होते.

वारकरी,शेतकरी, आदिवासी, बारा बलुतेदार व अठरा पगड जातीच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली.यनिमित्ताने पोवाडे,आदिवासी नृत्य,साहसी खेळ व शिवकालीन युद्धनीती चे साहसी प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. संतांना अभिप्रेत असणारे विचार व त्याअनुषंगाने छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेले रयतेचे राज्य (स्वराज्य)व त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले आपल्या भारताचे संविधान आणि त्यातील विचार यांचे संवर्धन, संरक्षण करण्याबाबत शपथ घेण्यात आली. यावेळी रायगडाचा परिसर जयघोषाने अक्षरशः दुमदुमून गेला होता.

यावेळी उल्का महाजन,कॉ. धनाजी गुरव, संदीप बर्वे,डी. बी. पाटील,माजी पोलीस आयुक्त सुरेश खोपडे,कैलास देसाई, ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर,पैगंबर शेख, रमेश पाटील, डॉ.जालिंदर घिगे,ह.भ.प.संदीप महाराज काकड,ह.भ.प.शांताराम महाराज घुले, मछिंद्र कोल्हाळकर, संजय शिंदे, उत्तम पाळंदे,दीपक भांगरे, स्वप्नील धांडे,रमेश वारुळे,पंडित सर, सखाराम गांगड, मीनानाथ उघडे यांनी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*