डॉ. भारत पाटणकर यांनी दीन दुबळ्यांना संकटातून मुक्त करण्यासाठी आयुष्य खर्ची घातलं : डॉ. आ.ह. साळुंखे

सातारा : विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र सातारा जिल्ह्याच्यावतीनं आयोजित करण्यात आलेलं दोन दिवसीय अभ्यास शिबीर नुकतंच पार पडलं. या अभ्यास शिबिरात कष्टकऱ्यांचे नेते डॉ. भारत पाटणकर यांचा पंच्याहत्तरी निमित्त विद्रोही सांस्कृतिक चळवळीकडून ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ.ह. साळुंखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सामाजिक समर्पण या दोन शब्दांमध्ये भारत पाटणकर यांच्या कामाचा गौरव करता येईल, असं डॉ. आ. ह. साळुंखे यांनी म्हटलं.

भारत पाटणकर वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर इतरांप्रमाणं त्यांना पैशांच्या मागं लागता आलं असतं, त्यांनी ठरवलं असतं तर ते तस करु शकले असते पण दीन दुबळ्यांना संकटातून मुक्त करण्यासाठी त्यांनी आयुष्य खर्ची घातलं, असं डॉ. आ. ह. साळुंखे म्हणाले. डॉ. भारत पाटणकर यांची कार्यकक्षा विस्तृत आहे, विद्रोही सांस्कृतिक चळवळ हा त्यांच्या कामाचा एक भाग आहे. भारत पाटणकर यांच्या कुटुंबानं समाजासाठी समर्पणाच्या भावनेतून काम केलं आहे. नव्या पिढीमध्ये स्वातंत्र्य, बंधुता, समता रुजवण्यासाठी डॉ. भारत पाटणकर यांनी आयुष्य खर्ची घातलं.

विद्रोही सांस्कृतिक चळवळीला २५ वर्ष होत असताना त्यांनी डॉ. भारत पाटणकर यांचा सत्कार करण्याचा निर्णय अभिनंदनीय आहे. धारावी येथील पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाचं उद्घाटक म्हणून यावं यासाठी पहिला फोन भारत पाटणकर यांचा आला होता, ही आठवण डॉ. आ. ह. साळुंखे यांनी सांगितली.

विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं सामाजिक प्रश्न सोडण्यासाठी जोमानं काम करावं, मी विद्रोही सांस्कृतिक चळवळीसोबत शेवटच्या श्वासापर्यंत आहे, असं देखील आ. ह. साळुंखे म्हणाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*