
सातारा /पुणे: छत्रपती शिवरायांच्या आज्ञेप्रमाणे आम्ही कोणत्याही धर्माचा द्वेष करणार नाही. कधीही जाती धर्माच्या नावाने भेदभाव करणार नाही. महिलांचा आदर राखू. अंधश्रद्धांना बळी पडणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यातून दाखवून दिलेल्या मानवी मूल्यांना जनतेत रुजवण्याची शिवशपथ आजच्या दिनी आम्ही घेत आहोत अशी प्रतिज्ञा रायरेश्वर येथे आयोजित केलेल्या शिवशंभू स्वराज्य मोहिमेच्या प्रारंभाच्या वेळी उपस्थितांनी घेतली. ही शिव शपथ क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू एडवोकेट सुभाष पाटील यांनी उपस्थितांना दिली. त्यावेळी उपस्थितांनी छत्रपती शिवरायांच्या जय जय काराच्या घोषणा देऊन रायरेश्वर चा परिसर दुमदुमून टाकला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांसह रायरेश्वर येथे स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती त्या घटनेला 27 एप्रिल 2025 रोजी 380 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा शिव शपथ घेऊन प्रतिज्ञाबद्ध होण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे प्रमुख ह.भ.प. भारतमहाराज जाधव , प्राचार्य डॉ.राजेंद्र कुंभार ( जयसिंगपूर) , कॉ. धनाजी गुरव ( कोल्हापूर) , विजय मांडके व प्रा.गौतम काटकर ( सातारा) , डॉ. जालिंदर घिगे, एडवोकेट अरुण जाधव, ( दोघेही अहिल्यानगर ) बी.जी. काका पाटील. ज्योती अदाटे ( सांगली ) , सदाशिव मगदूम (मिरज) , एडवोकेट भाऊसाहेब आजबे (पुणे) , दिनकर दळवी (भोर ) कैलास देसाई (शिराळा) , लोकायतचे निखील आदींच्या प्रमुख उपस्थितीत शिव शंभू स्वराज मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे व धोरणाचे आयुष्यभर पालन करेन याचबरोबर शिवरायांनी माणसाला जी स्वाभिमानाची शिकवण दिली , अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्यासाठी लढण्याचा मंत्र दिला , समतेच्या मूल्य विचाराला त्यांनी प्रत्यक्षात आणले तीच शिकवण घेऊन आयुष्यभर वागेन अशा प्रकारे शपथ घेऊन उपस्थित सर्वजण प्रतिज्ञाबध्द झाले.
संविधान दिनाला रायगडला कार्यक्रम
येत्या दि २६ नोव्हेंबर २०२५ रोजी किल्ले रायगड येथे भव्य अशी संविधान सन्मान रॅली शिव शंभू स्वराज्य मोहिमेच्या मार्फत आयोजित केली जाणार असल्याची घोषणा ह.भ.प. भारत महाराज जाधव यांनी केल्यानंतर उपस्थितांनी त्याला हात उंचावून आणि टाळ्या वाजवून संमतीची दाद दिली. रायगडावरील कार्यक्रमात सर्वधर्मातील जनता एकत्र येवुन छ. शिवरायांना अभिवादन करणार आहेत.
ज्येष्ठ इतिहास संशोधक व विचारवंत डॉ राजेंद्र कुंभार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कार्यशैली आणि आगामी काळातील आव्हानांबाबत प्रभावी मार्गदर्शन केले.यावेळी विविध ठराव मांडण्यात आले.
यावेळी एडवोकेट अरुण जाधव , एडवोकेट भाऊसाहेब आजबे , डॉ जालिंदर घिगे , अशोक शिरोळे , दिनकर दळवी , बीजी पाटील , सौ ज्योती अदाटे सदाशिव मगदूम व स्नेहल आदींची भाषणे झाली.
सातारा,सांगली ,कोल्हापूर पुणे , धाराशिव , अहिल्यानगर , छत्रपती संभाजीनगर , अकोला , रायगड आदी जिल्ह्यातून कार्यकर्ते , गडकिल्ले व वन संवर्धन करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी , वारकरी कीर्तनकार सहभागी झाले होते.
Leave a Reply