
हजरजबाबी , हमशकल – काळू- बाळू : विजय मांडके
महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील प्रसिद्ध तमाशा कलावंत काळू आणि बाळू. काळू आणि बाळू हे दोघे जुळे भाऊ. काळू म्हणजे लहू संभाजी खाडे. तर बाळू म्हणजे अंकुश संभाजी खाडे. वडिलोपार्जित तमाशाची परंपरा असणाऱ्या संभाजी आणि शेवंताबाई कवलापूरकर या दाम्पत्याच्या पोटी सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथे १६ मे १९३३ रोजी या दोघांचा जन्म झाला.
शिवा- संभा चा तमाशा पुढे काळू बाळू कवलापूरकर यांचा तमाशा म्हणून प्रसिद्ध झाला. सामाजिक भान असलेला तमाशा कलावंत भाऊ फक्कड यांनी लिहिलेला प्रेमाची फाशी हा वग सर्वप्रथम काळूबाळू चा पहिला वग म्हणून तमाशाच्या बोर्डावर उभा राहिला. काळू बाळू दोघेही जुळे असल्यामुळे कोण काळू आणि कोण बाळू हे ओळखणे कठीण होई. दोघांचा चेहरा रंगरूप आकारमान अगदी तंतोतंत जुळणारे. हमशकल असे हे भाऊ होते. काळू बाळू तमाशा मंडळाने साधारणपणे पंधरा वगनाट्य सादर केली. त्यात कोर्टात मला नेवू नका , भाऊ भावाचा , खून कुणाचा ? , इंदिरा ही काय भानगड , भिल्लांची टोळी , प्रेमाची फाशी , दगलबाज मित्र , सत्ता द्यावी सुनेच्या हाती , रक्तात रंगली दिवाळी , इंडियन पिनल कोड कलम ३०२ , तुझ्यासाठी वेडा झालो , शेराला भेटला सव्वाशेर , जिवंत हाडाचा शैतान आणि जहरी प्याला इत्यादी सामाजिक राजकीय घडामोडींवर भाष्य करणारी वगनाट्य या दोघांच्या तमाशा मंडळाने सादर केली.
विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतिने सांगली येथे २०१० साली विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन आयोजित केले होते. त्याचे निमंत्रण देण्यासाठी ज्येष्ठ विचारवंत व विद्रोही चे उपाध्यक्ष प्रा. डॉ. बाबुरावजी गुरव व प्रा गौतम काटकर हे त्यांच्या निवासस्थानी गेले होते. त्याच बरोबर विद्रोही संस्कृतिक चळवळीचा एक भाग बनून कलाकार आजारी पडलेले असताना त्यांना भेटण्यासाठी सुद्धा मिरजेच्या रुग्णालयात विद्रोही चे कार्यकर्ते आवर्जून गेले होते. तसेच या कलाकारांना मदत विद्रोही च्या वतीने जबाबदारीचा भाग म्हणूनच दिली होती.
सुप्रसिद्ध तमाशा कलावंत लोकशाहीर भाऊ फक्कड यांचा प्रेमाची फाशी हा पहिला वग या दोघांच्या तमाशा मंडळाने सादर केला. त्याच भाऊ फक्कड यांच्या नावाने सातारच्या क्रांती थिएटरच्या वतीने लोकशाहीर भाऊ फक्कड स्मृती पुरस्कार सन २००० साली या दोघांनाही सातारा येथे समारंभपूर्वक देण्यात आला. त्यावेळी सातारा येथील पत्रकार व विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र चे विजय मांडके यांनी त्यांची आवर्जून भेट घेवुन अभिनंदन केले होते.
काळू- बाळू यांच्या जयंतीनिमित्त या महान लोककलावंतांना विनम्र अभिवादन.
Leave a Reply