
India celebrates Republic Day 2025 every year on January 26 Speech in Marathi: संपूर्ण भारत देश आज प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. भारतीय संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 या दिवसापासून करण्यात आली. भारताचे संविधान लागू करून गव्हर्मेंट ऑफ इंडिया अॅक्ट 1935 रद्दबातल करण्यात आला. या दिवसापासून भारत सार्वभौम, लोकशाही, गणराज्य देश बनला.
भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचं बलिदान देणाऱ्या आणि संघर्ष करणाऱ्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांचा स्मरण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.
भारताचे संविधान लागू होताच गुलामीच्या बेड्या पूर्णपणे तुटल्या. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा देश अशी ओळख आपल्या देशाची बनली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वातील मसुदा समितीने संविधानाची निर्मिती केली. संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले. मात्र, त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली. भारताच्या संविधानातून न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि एकात्मता या मूल्यांचा स्वीकार आपल्या विविधतेने नटलेल्या देशाने केला.
भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग आणि त्यांच्या दूरदृष्टीची आठवण स्वातंत्र्य दिना दिवशी आणि प्रजासत्ताक दिना दिवशी प्रत्येकाला येतेच. मात्र प्रत्येक भारतीयाने जबाबदार नागरिकाची भूमिका दररोज पार पाडली पाहिजे. ज्यामुळे आपला देश सर्वसमावेशक भारताच्या दिशेने वाटचाल करेल.
आज आपण तिरंगा झेंड्याचे ध्वजवंदन करत असताना आणि झेंड्याला सलामी देत असताना आपल्या देशातील विविधतेचा सन्मान केला पाहिजे. देशाच्या प्रगतीत संविधानिक मूल्यांना अनुसरून आणि कटिबध्द राहून योगदान दिलं पाहिजे.
आपल्या संविधानाचा सन्मान करण्याचा संकल्प करून तो प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करुयात. आपल्या देशाबद्दल अभिमान निर्माण होईल अशी कृती करण्याचा संकल्प आणि प्रतिज्ञा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने करूया..
Leave a Reply