सातारा : चळवळीची संघटनात्मक बांधणी करताना सर्वांगीण पद्धतीनं काम करण्याची गरज आहे. शिक्षण, सामुदायिक व्यवहार, विद्यार्थ्यांचे, तरुणाईचे प्रश्न या सर्वांचा विचार करुन संघटनात्मक उभारणी करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन माजी समाजकल्याण आयुक्त आर.के. गायकवाड यांनी केलं. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या दोन दिवसीय अभ्यास शिबिराचं उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आपल्याला नव्यानं काय निर्मिती करता येईल ते पाहणं आवश्यक आहे. जागतिकीकरणाच्या लाटेत काय टिकणार आहे याचा विचार करुन तरणाईसोबत संवाद साधायला हवा, असं आर. के. गायकवाड यांनी म्हटलं.
महाराष्ट्रात संतांची चळवळ निर्माण झाली. मराठी मातीत तयार झालेल्या संतांमध्ये संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत जनाबाई अशा संतांनी त्या त्या काळात वाईट रुढी, प्रथा होत्या, त्याच्या विरोधात संघर्ष करण्याचं काम संतांच्या चळवळींनी केला. संत महात्म्यांना किती त्रास सहन करावा लागला. प्रचलित समाजव्यवस्थेच्या विरोधात, प्रचलित रुढींच्या विरोधात संघर्ष करायचा असेल, सांस्कृतिक परिवर्तन करताना त्रास संत तुकाराम महाराजांना भोगावा लागला, असं आर. के. गायकवाड यांनी म्हटलं.
तरुणांसोबत सकारात्मक दृष्टीनं संवादाची गरज
आर. के. गायकवाड पुढे बोलताना म्हणाले, चळवळ चालवण्यासाठी मनुष्यबळाची गरज असते. नवनिर्मिती करताना जागतिकीकरणाच्या लाटेत काय टिकेल, नव्या पिढीली काय देता येईल याचा विचार करुन चळवळींनी वाटचाल करण्याची गरज आहे. जगण्याकडे सकारात्मक दृष्टीनं पाहून तरुणाईला सकारात्मक दृष्टिकोन देणं गरजेचं असतं. त्यासाठी अशा प्रकारची अभ्यास शिबिरं होणं गरजेची असल्याचं आर.के. गायकवाड यांनी म्हटलं. तरुणाईनं जगातल्या नोकऱ्यांचा वेध घेण्याची गरज आहे. जपानी भाषा, जर्मन भाषा यांसारखी विविध कौशल्य शिकून नव्या संधी मिळवाव्या लागतील, असं आर. के. गायकवाड म्हणाले.
ह.भ.प डॉ. सुहास फडतरे यांनी अभ्यास शिबिराच्या उद्घाटन सत्राचं अध्यक्षपद भूषवलं. संतांनी समतेची चळवळ महाराष्ट्रात चालवण्याचं काम केलं. गौतम बुद्धांपासून समतेची चळवळ सुरु आहे. समाजातील विषमता दूर करण्यासाठी संतांनी काम केलेलं आहे. संतांची चळवळ ही समतेची होती. संत तुकाराम महाराजांनी समाजातील विषमता, जातीयता नष्ट व्हावी यासाठी चळवळ आणि अभांगाची रचना केली, असं डॉ. सुहास महाराज फडतरे यांनी म्हटलं.
दुसऱ्या सत्रात चळवळी आणि नवमाध्यमं या विषयावर प्रा. भाई शैलेंद्र माने, मिलिंद पवार, नितीन चंदनशिवे यांनी मांडणी केली. नितीन चंदनशिवे यांनी समाजप्रबोधनाच्या कामात कविता कशी महत्त्वाची यावर भाष्य केलं. भाई शैलेंद्र माने यांनी सध्याच्या नवमाध्यमांकडे सकारात्मक दृष्टीनं पाहून आपला विचार पोहोचवण्यासाठी रचनात्मक कामाची गरज असल्याचं म्हटलं. नवमाध्यमांवर महापुरुषांचे विचार पोहोचवण्याचा प्रयत्न तरुणाईनं करावा, असं आवाहन त्यांनी केलं. मिलिंद पवार यांनी नवमाध्यमांचा वापर करताना आपण एकमेकांमधील संवाद विसरत चाललो असल्याचं म्हटलं. आपल्यामधील संवाद तुटणार नाही याची काळजी घेऊन प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं.
विद्रोही अभ्यास शिबिराला चळवळीचे कार्याध्यक्ष कॉ. धनाजी गुरव, कवी वाहरुभाऊ सोनवणे,डॉ. भास्कर कदम, प्रा. अजित जगताप, डॉ. रवींद्र चव्हाण, प्रा. संजय भोईटे, अॅड. सरफराज बागवान, अॅड. सुभाष पाटील, डॉ. सुवर्णा कांबळे, डॉ. जालिंदर घिगे, प्रा. बापू चंदनशिवे यांच्यासह विद्रोहीचे कार्यकर्ते उपस्थित होते. विद्रोही कार्यकर्त्यांनी चळवळीची गाणी सादर केली. अभ्यास शिबिराच्या उद्घाटन सत्राचं सूत्रसंचालन प्रा. गौतम काटकर आणि आभार शिवराम ठवरे यांनी मांडले.
Leave a Reply