सातारा : विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेलं दोन दिवसीय अभ्यास शिबिर उत्साहात संपन्न झालं आहे.लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागासह लढ्यातून स्वातंत्र्य मिळालं, राज्यघटनेतील विचाराचा जागर सुरु ठेऊ, असं डॉ. बाबुराव गुरव यांनी म्हटलं. चळवळीच्यावतीनं त्यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त सन्मान करण्यात आला याला उत्तर देताना ते बोलत होते.
उमाजी नाईक यांनी स्वातंत्र्याच्या लढयाला सुरुवात केलेली त्यांचं देखील स्मरण करणे आवश्यक आहे. इंग्रजांविरुद्ध त्यांनी संघर्ष केला होता इंग्रजांना परत घालावल्याशिवाय देशाचं वैभव परत येणार नाही या भावनेतून त्यांनी संघर्ष केला, असं बाबुराव गुरव म्हणाले. वाहरुभाऊ सोनवणे यांनी यावेळी बोलताना आदिवासी संस्कृती समतेच्या विचारांना महत्त्व देते. आदिवासी संस्कृतीमधील समतेचा, स्वातंत्र्यांचा विचार सर्वांनी स्वीकारण्याचं आवाहन केलं.
अभिनेते किरण माने यांनी विद्रोही कार्यकर्त्यांशी मुक्तसंवाद साधला. संत तुकाराम महाराज यांनी अभंगाच्या माध्यमातून उत्तम व्यवहार करण्याचा संदेश दिला. चांगली शेती कशी करावी, असे त्यांचे अभंग असताना आपल्याला तुकाराम महाराजांबाबत वेगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या, असं किरण माने म्हणाले. संत तुकाराम महाराजांची महानता आपल्यापासून लपवण्याचा प्रयत्न झाला. डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या विद्रोही तुकाराम या पुस्तकातून मला खरे तुकाराम महाराज समजले, असं किरण माने म्हणाले. लय आणि बी या ग्रामीण बोली भाषेतले शब्द आहेत. या गोड शब्दांचा वापर करण्यास आपण आपल्यापासून सुरुवात करुया, असं किरण माने म्हणाले.
चला व्यक्त होऊया या सत्रात राजवैभव शोभा रामचंद्र आणि प्रा. दिनकर दळवी यांनी मार्गदर्शन केलं. संविधानाची मांडणी करताना कार्यकर्त्यांनी आपल्या विचारांवर ठाम असलं पाहिजे. आपली मांडणी तर्कसंगत करताना आपण विरोधकांच्या मुद्यांच्या जाळ्यात न अडकता आपल्या मुद्यांवर मांडणी करावी, असं राजवैभव शोभा रामचंद्र म्हणाले. प्रा. दिनकर दळवी यांनी भारतीय संस्कृतीच्या इतिहासाची पुर्नलेखनाची गरज असल्याचं प्रतिपादन केलं.
शाहीर संजय जाधव यांनी चळवळीची गाणी सादर केली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या माझी मैना गावावर राहिली यांच्या गीतानं कार्यक्रमाची सुरुवात झाली, तर शाहीर अमरशेख यांच्या दुनिया दोन हातांची या भैरवीनं समारोप करण्यात आला. पूजा भिसे, प्रियांका बळीप, अर्पिता देवरुखकर, सादिका बागवान, अमित कांबले यांनी त्यांना साथ दिली.
Leave a Reply